डी​.​जे. बंदीसाठी जनचळवळ !

663

Let’s get to 1000 signatures!
Petitions with 1,000+ supporters are 5x more likely to win!

The Issue

प्रति,
जिल्हाधिकारी, नागपूर
आयुक्त, नागपूर महानगरपालिका
पोलीस आयुक्त, नागपूर
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

नागपूर शहर हे उत्सवप्रिय आणि संवेदनशील शहर आहे. सर्वधर्मीय सण-उत्सव, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम, मोठे सार्वजनिक इव्हेंट, तसेच निवडणुकांच्या मिरवणुका... प्रत्येकाला आनंद साजरा करण्याचा आणि उत्साह व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

मात्र या आनंदाच्या नावाखाली कर्णकर्कश डी.जे., प्रचंड आवाजातील साउंड सिस्टीम आणि अतितीव्र लेजर लाईटचा वाढता वापर हा नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेसाठी गंभीर प्रश्न बनत आहे.

ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना या ध्वनिप्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा नियम आणि निर्धारित मर्यादांचे उल्लंघन होत असतानाही त्यावर अपेक्षित कठोर कारवाई होत नाही, ही चिंतेची बाब आहे.

आमची मागणी स्पष्ट आहे : 

१. डी.जे. आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील विद्यमान नियमांची कठोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी.

२. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, आयोजक, मंडळे किंवा संस्थांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी.

३. सर्वधर्मीय उत्सव, लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, मोठे इव्हेंट आणि निवडणूक मिरवणुका; सर्वांसाठी ध्वनिप्रदूषणाचे नियम समान असावेत आणि त्यांची अंमलबजावणीही समानपणे व्हावी.

४. अतितीव्र लेजर लाईटच्या वापराबाबत स्पष्ट नियम निश्चित करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे.

५. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी सुलभ आणि तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात यावी.

६. आणि सर्वात महत्त्वाचे... डी.जे.मुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा कायमस्वरूपी विचार करून, आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया राबवत नागपूर शहरात डी.जे.च्या वापरावर टप्प्याटप्प्याने बंदी आणण्याच्या दिशेने ठोस निर्णय घेण्यात यावा.

आमची भूमिका :

- आम्ही उत्सवाच्या विरोधात नाही.
- आम्ही आनंदाच्या विरोधात नाही.
- आम्ही जल्लोषाच्या विरोधात नाही.

आम्ही विरोध करतो तो कर्णकर्कश आवाजाला.
आम्ही विरोध करतो तो ध्वनिप्रदूषणाच्या अतिरेकाला.
आम्ही विरोध करतो तो नागरिकांच्या आरोग्य आणि शांततेवर होणाऱ्या अतिक्रमणाला.

आम्हाला असे नागपूर हवे आहे, जिथे उत्सव साजरे होतील, आनंद साजरा होईल; पण त्यासाठी नागरिकांच्या आरोग्याची आणि शांततेची किंमत मोजावी लागणार नाही.

आज आपण केवळ तक्रार करण्यासाठी नव्हे, तर कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी एकत्र येत आहोत.

ही मागणी केवळ आजसाठी नाही; ही आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे.

आपणही या पीटिशनवर स्वाक्षरी करून या चळवळीला आपला पाठिंबा द्या.

आपला आवाज नोंदवा.
आपल्या शहरासाठी आवाज उठवा.

लोकांसाठी, लोकांनी उभी केलेली ही लोकचळवळ बनवूया!

डी.जे.मुक्त, ध्वनिप्रदूषणमुक्त आणि संवेदनशील नागपूरसाठी... आजच सहभागी व्हा...!

avatar of the starter
Sandip JoshiPetition Starterसंदीप जोशी हे नागपूरच्या सार्वजनिक जीवनातील सक्रिय आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे महापौर तसेच आमदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Petition Updates