
पुणे तिथे काय उणे?
भारतातील पहिला सीवर(Sewer)फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प!
आजवर आम्ही पुणेकरांनी आपल्या देशाला अनेक संकल्पनांची भेट दिलेली आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न - संकल्प, अटकेपार झेंडे फडकवण्याची हिंमत, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याची जाणीव, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निवारण हे सगळे ट्रेंड पुण्यातून सुरू झाले आणि त्यांनी मोठा इतिहास घडवला. असाच एक ऐतिहासिक नवीन ट्रेंड घडवण्याच्या उंबरठ्यावर आज आम्ही पुणेकर उभे आहोत. आणि तो आहे सिवर फ्रंट डेव्हलपमेंटचा!
एकेकाळी पुण्याचे वैभव असलेल्या मुळा मुठा नद्या या आज आमचे सांडपाणी, मलमुत्र वाहून नेणारी गटारे (sewer) झाली आहेत हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. भिडे पुल, सिद्धेश्वर चा कॉजवे किंवा जयंतराव टिळक पुलावर उभे राहिले तर खाली न बघतासुद्धा पुलाखालून नक्की काय वाहतय हे येणाऱ्या असह्य दुर्गंधी मुळे कोणीही सांगू शकत. आणि याबद्दल हळहळ व्यक्त करणे हा प्रत्येक पुणेकराचा आवडता छंद आहे.
पण २०१४ साली केंद्रीय पर्यावरण मंत्री असलेल्या आमच्या पुण्याच्याच जावडेकर साहेबांनी जायका नावाच्या नदिसुधार प्रकल्पाची घोषणा केली आणि येत्या ४-५ वर्षात आमच्या मुळा मुठा या मैलामुक्त होतील याची ग्वाही दिली. तसे आम्ही पुणेकर दुसऱ्यावर इतका सहजासहजी विश्वास ठेवत नाही आणि समोरचा जर पुणेकरच असेल तर अजिबातच नाही! पण आम्ही नेहमीप्रमाणे परिस्थितीचा सांगोपांग विचार केला. मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खंबीर मोदी सरकार केंद्रात, अभ्यासू आणि प्रामाणिक असा लौकिक असलेले भाजप - सेना युतीचे सरकार राज्यात आणि भाजपाचेच सरकार आमच्या पुणे मनपात! आणि यावर कडी म्हणजे या प्रकल्पासाठी चा १००० कोटींचा निधी मंजूर! हे पाहून आमची मनोमन खात्री पटली की आता आमच्या नद्या लवकरच शुद्ध होणार. भिडे पुलावर शाहरुख खानच्या पोझ मध्ये उभे राहून स्वच्छ मोकळा श्वास छातीत भरून घेत आहोत अशी स्वप्नेही आम्हाला वरचेवर पडू लागली!!
पण महिने सरले, वर्षे सरली आणि आज २०२२ उजाडले तरी या प्रकल्पाचे निम्मे अर्धे सोडाच पण काहीही काम अजून चालुही झाले नाही. या दिरंगाई मुळे हा निधी परत जाण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावडेकर साहेब, बापट साहेब यांच्यासारखे दिग्गज आणि वजनदार नेते केविलवाणी धडपड करताना आज दिसत आहेत. त्यामुळे आमचे ते स्वप्न मुळा मुठेतच कायमचे वाहून गेल्यात जमा आहे.
पण असं वाटत असतानाच आमच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने आम्हाला यापेक्षा एक भारी स्वप्न दाखवले आहे. आणि ते म्हणजे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचे.
नदी काठांचे सुशोभीकरण. आजपर्यंत फक्त परदेशात दिसणारे गुळगुळीत, चकाचक नदीकाठ, जॉगिंग ट्रॅक, हिरवळ, अंफी थिएटर, मॉल, नदीकिनारीचौपाट्या, हॉटेल्स हे सगळ आमच्या पुण्यात सुद्धा अनुभवायला मिळणार. आणि हे नुसत स्वप्न नाही. याच कामही काही दिवसात धडाक्यात चालू होईल. आणि हो, तो जायका प्रकल्प ' फक्त ' १००० कोटींचा होता (जो आता विलंबा मुळे १६०० कोटींचा झाला आहे. पण ते असो) आणि त्यातले ९५० कोटी केंद्र सरकार देणार होते. पण हा रिव्हर फ्रंट प्रकल्प आहे तब्बल ४०००-४५०० कोटींचा आणि तो आम्ही साकारणार आहोत स्वबळावर! पुणेकरांना पैशाची कमी नाही. आमच्या रक्तातली पेशवाई अजून अजिबात उतरली नाहीये. चांगले डांबरी रस्ते उखडून सिमेंट रस्ते करणे, दर सहा महिन्यांनी पेव्हर ब्लॉक बदलणे, पाट्या बदलणे अशी शेकडो कोटींची कामे आम्ही सहज जाता जाता किरकोळीत करत असतो. त्यामुळे या ४००० कोटींची आम्हाला भीती सोडा, साधी चिंताही वाटत नाही. पुण्याची प्रगती होत असेल तर आम्ही जादा कर भरायला कायम तयार असतो.
काही अती शहाणे पुणेकर मात्र हा प्रकल्प कसा चुकीचा आहे, पैशांची उधळपट्टी आहे, पर्यावरणाला कसा घातक आहे आणि हा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प न होता सिवर् (sewer) फ्रंट डेव्हलपमेंट कसा होणार आहे असे सांगून यात मोडता घालू पाहत आहेत. पण या अशा लोकांना कोणी काळ कुत्र विचारत नाही. आणि त्यामुळेच आज पुण्याची चौफेर प्रगती झाली आहे आणि होताना दिसतीये.
आम्ही म्हटल समजा झाला हा प्रकल्प सीवर् फ्रंट डेव्हलपमेंट. तर काय बिघडणार आहे? एकतर हा प्रकल्प झाला तरी आम्ही नदीच्या (किंवा त्या गटाराच्या) जवळ थोडेच जाणारे? आम्ही मस्त नवीन चौपाटी वरच्या नवीन हॉटेल मध्ये बसून मिसळ चापणार. आला थोडाफार वास तिथे तरी तो वास आता आमच्या अंगवळणीच पडलाय. त्याचा आम्हाला काहीही त्रास होत नाही. झाला असता तर इतक्या वर्षात आम्ही आमच्या नेत्यांना, प्रशासनाला त्यावर काम करायला लावलं नसत का? नदीचं गटार झालं म्हणून काय बिघडतंय? आमच्या नळाला येणार पाणी बघा. देशात सर्वात जास्त आणि सर्वात शुद्ध पाणी फक्त पुणेकरांनाच मिळतं.
मुळात देशात सर्वात सुजाण, सजग आणि हुशार नागरिक म्हणजे आम्ही पुणेकर. अशा शहराचा कारभार सांभाळणारे प्रशासन आणि अशा नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी - यांच्या क्षमतेबद्दल शंका घेताना विचार कराल का नाही? थोडा तरी विश्वास ठेवाल का नाही? का फक्त तुम्ही एकटेच हुशार?
ते काही नाही. हा प्रकल्प होणार म्हणजे होणारच. त्या सिवर् फ्रंट वर असलेल्या नवनवीन हॉटेल मध्ये आम्ही रोज मिसळ, खिचडी, पोहे, वडे आणि काय काय भरपूर चापणार आणि pune eat outs वर त्याचे फोटो आणि रिव्ह्यू छापणार. आणि मस्त एन्जॉय करणार. हे अती शहाणे सुद्धा तिथेच येणार आणि तेही तेच करणार. फक्त रिव्ह्यू लिहिताना ते एक कुचकट तळटीप टाकणार - 'ग्रेट ambience, सुपर taste. जर नदीही स्वच्छ दिसली असती तर अजून मजा आली असती!'
पण ते जाऊदे. द्या सोडून.
एक दिवस सगळ जग बघेल. हा प्रकल्प एक नवीन ट्रेंड सेट करणार. सिवर् फ्रंटचा पुणे पॅटर्न राबवण्यासाठी देशभरातील शहरांमध्ये स्पर्धा होणार. आणि पाहिले वाहिले सिवर् फ्रंट प्रकल्प साकारल्या बद्दल पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार!
मनीष घोरपडे
एक नदिप्रेमी पुणेकर
तळटीप - वरील सर्व गोष्टी तुम्हाला काल्पनिक आणि मनोरंजनात्मक वाटत असतील तर सामान्य ज्ञान आणि current affairs याबद्दल अभ्यास करण्याची तुम्हाला नितांत गरज आहे.
आपल्या आजूबाजूची परिस्थिती, घटना, पेपरात येणाऱ्या याविषयीच्या बातम्या यांचा आणि वरील पोस्टचा जर कुठे संबंध वाटला तर तो निश्चितच योगायोग नाही.